Friday 27 July 2018

म्हातारी

सायंकाळी पाचची वेळ.. कामाचा थकवा आल्याने सहकाऱ्यासह चहा मारण्यासाठी एका महाविद्यालयासमोरील टपरीवर बसलो होतो. शेजारीच काही काॅलेजकुमार बसलेले. एकमेकांची खेचत शेजारून जाणाऱ्या मुलींवर तिरपा कटाक्ष टाकत होते. प्रत्येक जण आपआपल्या धुंदीत..


चहा पिऊन होत असतानाच एक जख्खड म्हातारी तेथे आली. पोट खपाटीला गेलेले.. हातापायाच्या काड्या.. चेहऱ्यावर सुरकुत्या.. आता ही नक्कीच पैसे मागणार, म्हणून आम्ही दोघेही सावरून बसलो; पण तिच्याकडे पाहून खूप कीव आली. पैसे देण्यापेक्षा तिला चहा-बिस्किट देऊ, असे मनात आलं; पण तोपर्यंत टपरीमालकानेच तिला चहा-बिस्किट दिलही.. 
       
चहा-बिस्किट संपल्यानंतर म्हातारी उठू लागली; पण तिला उठता येत नव्हतं. शेजारी बसलेल्या मुलांकडे ती मदतीसाठी हात देत होती, पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. मित्राने मला तिला मदत करण्यासाठी जाण्यास सांगितलं. मी पुढे होऊन तिला हात देत उठवलं. 'मला रस्त्याच्या त्या बाजूला सोडतो का?' अस तिने विचारलं. मी रस्त्याने सुसाट जाणाऱ्या गाड्या थांबवत, तिला रस्ता पार करून दिले. 'मला आणखीन थोड पुढं सोड' अशी विनवणी तिनं केली.
   
तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होत. तिची मुलं कोठे असतील. बिचारीने आयुष्यभर मुलांसाठी खस्ता खाल्ल्या असतील. मग का तिला त्यांनी अस वाऱ्यावर सोडून दिलं असेल? असा विचार करीत असतानाच खिशात हात घातला. जितके पैसे हाताला लागले, ते काढून म्हातारीला देत मी तेथून निघालो..!!

दी फॅमिली मॅन : भावभावनांच्या कल्लोळात अॅक्शनचा तडका..!

  दुपारच्या वेळी मोबाईलवर टाईमपास चालला होता. अॅमेझाॅनवर काही वस्तू पाहत असताना, अचानक एक मेसेज दिसला. 'अॅमेझाॅन प्राईम'चा 15 दिवसां...