Sunday 6 June 2021

दी फॅमिली मॅन : भावभावनांच्या कल्लोळात अॅक्शनचा तडका..!


 

दुपारच्या वेळी मोबाईलवर टाईमपास चालला होता. अॅमेझाॅनवर काही वस्तू पाहत असताना, अचानक एक मेसेज दिसला. 'अॅमेझाॅन प्राईम'चा 15 दिवसांसाठी 'सरप्राईज गिप्ट' म्हणून 'फ्री' लाभ घेता येणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटलं होतं. लगेच जाॅईन झालो. अॅमेझाॅन प्राईमचे अॅप डाऊनलोड केलं.

अँप उघडताच समोर चित्रपट, वेबसिरीजचा खजिना पडला होता. सुरुवात कुठून करावी, असा प्रश्न पडला. 'फॅमिली मॅन' या वेबसिरीजबद्दल फार ऐकले होते. त्यामुळे सुरुवात याच वेबसिरीजपासून करण्याचे ठरविले. या वेबसिरीजचा प्रत्येक भाग 40 मिनिटांचा आहे, त्यामुळे पूर्ण सिरीज पाहायला 3 दिवस लागले. फॅमिलीसोबतच 'फॅमिली मॅन' पाहण्यास सुरुवात केली. पहिला भाग संपत आला असतानाच, 3 जूनला या वेबसिरीजचा दुसरा भाग आला. पहिला भाग आवडल्याने लगेच दुसरा भागही पाहण्यास सुरुवात केली.

'फॅमिली मॅन'चा हिरो आहे, श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी). 'टास्क' (TASK) या भारतीय गुप्तहेर संस्थाचा 'सिनियर अनॅलिस्ट' आणि 'फॅमिली मॅन'. देशसेवा आणि फॅमिली सांभाळताना त्याची कसरत सुरु आहे. पहिल्या भागात 'इसिस' आणि पाकिस्तानी 'आयएसआय' सोबत त्याचा संघर्ष झाला. एका केमिकल कंपनीत अतिरेकी गॅस लीकेज करतात आणि पुढे काय होणार, असा प्रश्न मागे ठेवूनच सिरीजचा पहिला भाग संपतो.

केमिकल कंपनीतील गॅस लिकेजमुळे अनेक बळी जातात. मात्र, टास्क फोर्समुळे मोठी हानी टळते, हे सिरीजच्या दुसऱ्या भागात समोर येते. मात्र, आपल्या चुकीमुळे काही जीव गेल्याची खंत श्रीकांत तिवारीला आहे.  त्यातून, तसेच फॅमिलीला वेळ देता यावा, यासाठी श्रीकांत तिवारी 'टास्क फोर्स' सोडून एका आयटी कंपनीत जाॅईन होतो. मात्र, त्याचे मन अजूनही 'टास्क फोर्स'मध्येच अडकले आहे. आपला जुना मित्र जे. के. तळपदे याच्याकडून तो सतत 'टास्क फोर्स'ची माहिती घेत असतो.  

फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या भागात तामिळ बंडखोर आणि पाकिस्तानी अतिरेकी यांनी भारताच्या पंतप्रधान (सीमा बिस्वास) यांची हत्या करण्याचा कट रचला आहे. मुंबई, दिल्ली चेन्नई, श्रीलंका, लंडन, फ्रान्स येथे ही कहाणी घडत असली, तरी मुख्य कथाभूमी चेन्नईच आहे. तमिळींच्या वेगळ्या देशासाठी हा संघर्ष सुरु आहे. त्यासाठी भारत सरकारने तमिळी बंडखोरांना पाठिंबा द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. 

दुसऱ्या भागाची सुरुवातच श्रीलंकन सैनिक आणि तमिळ बंडखोर यांच्यातील लढाईने होते. तमिळ बंडखोरांचे नेते भास्करण आणि दीपन तेथून निसटून लंडनला पळून जातात. भास्करनचा छोटा भाऊ सुब्बू चेन्नईत लपून बसतो. हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन श्रीलंकेचा उपयोग करून घेत आहे.
भारताने बंडखोर सुब्बूला श्रीलंकेच्या हवाली करुन आपल्या सरकारला पाठींबा दिल्यास ते चीनला दूर ठेवतील, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रुपतुंगा यांचे म्हणणे आहे. भारतीय पंतप्रधान त्यास मान्यता देतात. एका कारवाईत सुब्बू मारला जातो आणि भास्करण याचा बदला घेण्याचे ठरवितो. त्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांची मदत घेतो.

भारत आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांची चेन्नई येथे शिखर बैठक होणार आहे. त्याच वेळी तेथे हवाई हल्ला करण्याचा कट भास्करण रचतो. हे काम राजी (समंथा अक्कीनेनी) ही तमिळ बंडखोर करणार असते. तिकडे आयटी कंपनीतील बॉसच्या कटकटीला वैतागून आणि बायकोसोबतच्या भांडणाला कंटाळून श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा 'टास्क फोर्स' जॉईन करतो आणि भास्करणचा प्लॅन उधळून लावतो. 

पहिल्या भागाप्रमाणेच फॅमिली मॅनचा दुसरा भागही प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. पटकथा लेखक सुमन कुमार यांनी गुंतागुंतीचा विषय असतानाही कथेवरील पकड निसटू दिलेली नाही. प्रेक्षकांना उसंत घ्यायलाही वेळ मिळत नाही, इतक्या वेगाने घटना घडत जातात. श्रीकांत तिवारी याच्या भूमिकेत मनोज वाजपेयी याने कमाल केली आहे. मात्र, सगळ्यात भाव खाऊन जाते ती राजी. सामंथा अक्कानेनी हिने या भूमिकेत अक्षरश: जीव ओतला आहे.

या भागातील सर्वात प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे भाषा. हिंदी, मराठी आणि तामिळी भाषेचा वापर करण्यात आला आहे. मदतीला सबटायटल आहेतच. चेन्नईतील वातावरण, तेथील बोलीभाषेचा जसाच्या तसा वापर केल्याने, सिरीज कुठेही नाटकी वाटत नाही. तमिळी कलाकार या सिरीजची जान आहेत. किंबहुना त्यांच्यामुळेच या भागाला चार चाॅंद लागले आहेत. सिरींजमधील उणिवा म्हटल्या, तर काही ठिकाणी कहाणी रेंगाळल्यासारखी वाटते. मात्र, एकंदरीत विचार केल्यास ही सिरीज तुम्हाला नक्की आवडू शकते.
सिरीजचा शेवट होतानाच, श्रीकांत तिवारीला आणखी एका मोहिमेवर जावे लागणार असल्याचे स्पष्ट होते. आता चीनी कुरापतीविरोधात श्रीकांत तिवारी लढताना दिसेल. लवकरच या सिरीजचा तिसरा भाग येणार असल्याचे स्पष्ट होते. राहा तयारीत..! 

Monday 8 March 2021

तूच आदिशक्ती.. आजच्या युगाची प्रगती!


जागतिक महिला दिन.. अर्थात स्रीत्वाचा, तिच्या ममत्वाचा, आत्मसन्मानाचा एक उत्सवच. महिलांविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्याचा विशेष दिवस. वर्षांनुवर्षांचे पारंपरिक जोखड झुगारून महिला गुलामगिरीतून बाहेर आली असली, तरी आजही महिला अत्याचाराच्या घटना पाहिल्यावर रोजच महिला दिन साजरा करण्याची गरज जाणवतेच.!


प्रत्येक काळातील सामाजिक बदलानुसार महिलांची परिस्थिती बदलत गेली. एक उपभोगाचे साधन, दासी समजून अनेक वर्षे तिने पुरुषी अत्याचार, हालअपेष्टा सहन केल्या. पूर्वी महिलांना ना शिक्षणांची संधी होती, ना मतदान वा नोकरीचा अधिकार. या अन्यायाविरुद्ध 1908मध्ये न्यूयॉर्कमधील 15 हजार महिला पेटून उठल्या. रस्त्यावर उतरल्या. मतदानाचा अधिकार, कमी तासांची व चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी मोर्चा काढला. तेथून स्रीमुक्तीची चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्यानंतर 1910मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे निश्‍चित झाले.

भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा झाला होता. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी त्यापूर्वीच महिला सक्षमीकरणाची बिजे रोवली. अंगावर शेणाचा, चिखलाचा मारा सहन केला नि मुलींच्या शिक्षणाची पायवाट तयार झाली. एक स्री शिकली, तर कुटुंब साक्षर होते, हे त्यांनी जाणले. त्यांच्या अफाट जिद्दीमुळेच आजच्या "सावित्रीच्या लेकी' गगनभरारी घेत आहेत. नवनवी क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत.

"रांधा, वाढा, उष्टी काढा', "चूल आणि मूल'च्या जोखडातून आताची स्त्री कधीच बाहेर आली आहे. स्वत:च्या करिअरबरोबर ती कुटुंबही यशस्वीरित्या सांभाळते आहे. घरसंसाराला हातभार लावते आहे; पण ही लढाई अजून संपलेली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचे संपूर्ण जोखड तिला अजूनही भिरकावता आलेले नाही. अजूनही फार मोठी मजल मारायची आहे. आपल्या हक्काची जाणीव झाल्यावर तिने आवाज उठविण्यास सुरवात केली. त्यात तिला बऱ्यापैकी यशही मिळत गेले. 

आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात कार्यरत झाली आहे. अगदी लष्करातही ती आपले सामर्थ्य दाखवित आहे. त्याचबरोबर तिच्यातील सोशीकता, सहनशिलता, सर्जनता अद्याप टिकून आहे. महिलांच्या ठायी असणारी दया, प्रेम, ममत्व, सेवाभाव ती आजही निभावते आहे. मात्र, गरज आहे, समाजाने तिचा आत्मसन्मान जपण्याची! त्यासाठी रोजच जागतिक महिला दिन साजरा करण्याची..!

Saturday 27 June 2020

सु'शांत'


 
""जिंदगी में जीतने की कोशिश सभी करते हैं.., करनी भी चाहिए.., लेकिन अगर किसी कारण से जीत नहीं पाए, तो उसके बाद क्‍या..?'' "छिछोरे' या हिंदी चित्रपटातील "अन्नी'च्या (सुशांतसिंह राजपूत) तोंडी असलेला हा डायलॉग. "उसके बाद क्‍या..?' या प्रश्‍नाचं उत्तर कोणीच शोधत नाही. सुशांतसिंग गेला परंतु त्याने विचारलेला प्रश्‍न कायम ठेवून. नैराश्‍य आल्यानंतर एक कॉमन मॅन जो करतो तेच त्यानेही केलं...

परीक्षेत आलेल्या अपयशामुळे "अन्नी'चा मुलगा इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मात्र, तो उपचाराला कसलाही प्रतिसाद देत नाही. त्यावर डॉक्‍टर सांगतात, की मुळात त्याला जगण्याचीच आस नाही. त्यामुळे आमचे उपचारही त्याला बरे करू शकत नाहीत. मुलामध्ये पुन्हा एकदा जगण्याची आस निर्माण व्हावी. त्याने आयुष्याकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, यासाठी "अन्नी' मुलाला त्याची स्वत:ची आणि त्याच्या मित्राची, जे कधी काळी कॉलेजमध्ये मोठे "लुजर' म्हणून ओळखले जात असतात, त्यांचीच कहाणी सांगण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी तो कॉलेज जीवनातील जीवलग मित्रांनाही दवाखान्यात बोलावितो.. आणि येथून सुरू होते "छिछोरे' चित्रपटाची कहाणी... "लुजर' ते "विनर' बनण्यापर्यंतचा प्रवास.. शेवट अर्थातच सुखात्म होतो...

"दंगल' चित्रपटाचे निर्देशक नीतेश तिवारी यांनी "छिछोरे' चित्रपटातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्या हे कोणत्याही प्रश्‍नावरचं उत्तर असू शकत नाही. जीवनात प्रत्येकासमोर समस्या, अडचणी, मानसिक तणाव असतोच, किंबहूना तो कधी ना कधी येतोच..; पण त्यामुळे खचायचं नसतं...त्यातून मार्ग काढत पुढे जायचं असतं...

नेहमीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास "सकाळ' कार्यालयात येऊन बसत असतानाच, आमचे श्रीगोंद्याचे बातमीदार संजय काटे यांचा फोन आला. नेहमीप्रमाणे बातमीसाठी आलेला फोन असेल, असे सुरवातीला वाटले. मात्र, त्यांच्या "सुशांतसिंहने आत्महत्या केली' या वाक्‍याने सुरवातीला काहीसा बुचकळ्यात पडलो. "कोण सुशांतसिंह..?' माझ्या या प्रश्‍नावर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची भूमिका केलेला अभिनेता, असे त्यांनी सांगताच, डोक्‍यात एकदम प्रकाश पडला. एकदम अवाक्‌ होत "कधी केली त्याने आत्महत्या..?' माझ्या या प्रश्‍नावर त्यांनी टीव्हीवर बातमी सुरू आहे, असे सांगितले नि फोन कट झाला..

माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. अवघ्या 34 वर्षांच्या सुशांतसिंहने आत्महत्या करावी, हे मनाला काही पटत नव्हतं.. लगेच न्यूज चॅनेल सुरू केला, मग खात्री पटली. टीव्हीवरील मालिकांमधून सुशांतसिंहचे आगमन झाले. कसदार अभिनयाच्या बळावर अल्पावधीतच त्याने मोठा पडदाही व्यापून टाकला. संवेदनशील भूमिकांतून तो घराघरात नि मनामनात पोचला.. "काय पो छे' "पीके', "एम. एस. धोनी', "केदारनाथ' अशा अनेक चित्रपटांतून तो वेगवेगळ्या भूमिकांतून भेटत राहिला. त्या अनेकांच्या मनात घर करून बसल्या.

काही दिवसांपासून सुशांतसिंह "डिप्रेशन'मध्ये असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. चित्रपटातून समाजाला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा सल्ला देणाऱ्या सुशांतने आत्महत्या करावी? म्हणजेच, "रिल' आणि "रिअल लाईफ' याची जोड त्यालाही देता आली नाही.. स्वत:च्याच चित्रपटातून त्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता आला असता; पण बहुधा त्यालाही जगण्याची आस राहिली नसावी.. पोलिसांच्या तपासात त्याच्या आत्महत्येची कारणं समोर येतीलही.. पण; "हेही दिवस जातील', असं त्याला का वाटलं नसावं..

"छिछोरे' या सिनेमातच अन्नी म्हणतो, की ""मैने उससे (मुलाला) ये तो कहा था, की तेरे सिलेक्‍ट हो जाने के बाद बाप-बेटे साथ मिलकर शॅम्पेन पिएंगे। लेकिन मैंने उससे ये नहीं कहा, कि सिलेक्‍ट नहीं होने पर क्‍या करेंगे?'' जीवनात "डिप्रेशन' आल्यावर काय करायचे, हे सुशांतनेही ठरवले नव्हते. तोच म्हणतो, की ""प्लान "ए' से जरा भी कम अहम नहीं है प्लान "बी'.. अगर आप सिर्फ सफलता को जेहन में रखेंगे, तो असफलता आपको तोड़ देगी..''

Friday 27 July 2018

म्हातारी

सायंकाळी पाचची वेळ.. कामाचा थकवा आल्याने सहकाऱ्यासह चहा मारण्यासाठी एका महाविद्यालयासमोरील टपरीवर बसलो होतो. शेजारीच काही काॅलेजकुमार बसलेले. एकमेकांची खेचत शेजारून जाणाऱ्या मुलींवर तिरपा कटाक्ष टाकत होते. प्रत्येक जण आपआपल्या धुंदीत..


चहा पिऊन होत असतानाच एक जख्खड म्हातारी तेथे आली. पोट खपाटीला गेलेले.. हातापायाच्या काड्या.. चेहऱ्यावर सुरकुत्या.. आता ही नक्कीच पैसे मागणार, म्हणून आम्ही दोघेही सावरून बसलो; पण तिच्याकडे पाहून खूप कीव आली. पैसे देण्यापेक्षा तिला चहा-बिस्किट देऊ, असे मनात आलं; पण तोपर्यंत टपरीमालकानेच तिला चहा-बिस्किट दिलही.. 
       
चहा-बिस्किट संपल्यानंतर म्हातारी उठू लागली; पण तिला उठता येत नव्हतं. शेजारी बसलेल्या मुलांकडे ती मदतीसाठी हात देत होती, पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. मित्राने मला तिला मदत करण्यासाठी जाण्यास सांगितलं. मी पुढे होऊन तिला हात देत उठवलं. 'मला रस्त्याच्या त्या बाजूला सोडतो का?' अस तिने विचारलं. मी रस्त्याने सुसाट जाणाऱ्या गाड्या थांबवत, तिला रस्ता पार करून दिले. 'मला आणखीन थोड पुढं सोड' अशी विनवणी तिनं केली.
   
तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होत. तिची मुलं कोठे असतील. बिचारीने आयुष्यभर मुलांसाठी खस्ता खाल्ल्या असतील. मग का तिला त्यांनी अस वाऱ्यावर सोडून दिलं असेल? असा विचार करीत असतानाच खिशात हात घातला. जितके पैसे हाताला लागले, ते काढून म्हातारीला देत मी तेथून निघालो..!!

दी फॅमिली मॅन : भावभावनांच्या कल्लोळात अॅक्शनचा तडका..!

  दुपारच्या वेळी मोबाईलवर टाईमपास चालला होता. अॅमेझाॅनवर काही वस्तू पाहत असताना, अचानक एक मेसेज दिसला. 'अॅमेझाॅन प्राईम'चा 15 दिवसां...