Monday 8 March 2021

तूच आदिशक्ती.. आजच्या युगाची प्रगती!


जागतिक महिला दिन.. अर्थात स्रीत्वाचा, तिच्या ममत्वाचा, आत्मसन्मानाचा एक उत्सवच. महिलांविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्याचा विशेष दिवस. वर्षांनुवर्षांचे पारंपरिक जोखड झुगारून महिला गुलामगिरीतून बाहेर आली असली, तरी आजही महिला अत्याचाराच्या घटना पाहिल्यावर रोजच महिला दिन साजरा करण्याची गरज जाणवतेच.!


प्रत्येक काळातील सामाजिक बदलानुसार महिलांची परिस्थिती बदलत गेली. एक उपभोगाचे साधन, दासी समजून अनेक वर्षे तिने पुरुषी अत्याचार, हालअपेष्टा सहन केल्या. पूर्वी महिलांना ना शिक्षणांची संधी होती, ना मतदान वा नोकरीचा अधिकार. या अन्यायाविरुद्ध 1908मध्ये न्यूयॉर्कमधील 15 हजार महिला पेटून उठल्या. रस्त्यावर उतरल्या. मतदानाचा अधिकार, कमी तासांची व चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी मोर्चा काढला. तेथून स्रीमुक्तीची चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्यानंतर 1910मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे निश्‍चित झाले.

भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा झाला होता. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी त्यापूर्वीच महिला सक्षमीकरणाची बिजे रोवली. अंगावर शेणाचा, चिखलाचा मारा सहन केला नि मुलींच्या शिक्षणाची पायवाट तयार झाली. एक स्री शिकली, तर कुटुंब साक्षर होते, हे त्यांनी जाणले. त्यांच्या अफाट जिद्दीमुळेच आजच्या "सावित्रीच्या लेकी' गगनभरारी घेत आहेत. नवनवी क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत.

"रांधा, वाढा, उष्टी काढा', "चूल आणि मूल'च्या जोखडातून आताची स्त्री कधीच बाहेर आली आहे. स्वत:च्या करिअरबरोबर ती कुटुंबही यशस्वीरित्या सांभाळते आहे. घरसंसाराला हातभार लावते आहे; पण ही लढाई अजून संपलेली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचे संपूर्ण जोखड तिला अजूनही भिरकावता आलेले नाही. अजूनही फार मोठी मजल मारायची आहे. आपल्या हक्काची जाणीव झाल्यावर तिने आवाज उठविण्यास सुरवात केली. त्यात तिला बऱ्यापैकी यशही मिळत गेले. 

आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात कार्यरत झाली आहे. अगदी लष्करातही ती आपले सामर्थ्य दाखवित आहे. त्याचबरोबर तिच्यातील सोशीकता, सहनशिलता, सर्जनता अद्याप टिकून आहे. महिलांच्या ठायी असणारी दया, प्रेम, ममत्व, सेवाभाव ती आजही निभावते आहे. मात्र, गरज आहे, समाजाने तिचा आत्मसन्मान जपण्याची! त्यासाठी रोजच जागतिक महिला दिन साजरा करण्याची..!

No comments:

Post a Comment

दी फॅमिली मॅन : भावभावनांच्या कल्लोळात अॅक्शनचा तडका..!

  दुपारच्या वेळी मोबाईलवर टाईमपास चालला होता. अॅमेझाॅनवर काही वस्तू पाहत असताना, अचानक एक मेसेज दिसला. 'अॅमेझाॅन प्राईम'चा 15 दिवसां...