Sunday 6 June 2021

दी फॅमिली मॅन : भावभावनांच्या कल्लोळात अॅक्शनचा तडका..!


 

दुपारच्या वेळी मोबाईलवर टाईमपास चालला होता. अॅमेझाॅनवर काही वस्तू पाहत असताना, अचानक एक मेसेज दिसला. 'अॅमेझाॅन प्राईम'चा 15 दिवसांसाठी 'सरप्राईज गिप्ट' म्हणून 'फ्री' लाभ घेता येणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटलं होतं. लगेच जाॅईन झालो. अॅमेझाॅन प्राईमचे अॅप डाऊनलोड केलं.

अँप उघडताच समोर चित्रपट, वेबसिरीजचा खजिना पडला होता. सुरुवात कुठून करावी, असा प्रश्न पडला. 'फॅमिली मॅन' या वेबसिरीजबद्दल फार ऐकले होते. त्यामुळे सुरुवात याच वेबसिरीजपासून करण्याचे ठरविले. या वेबसिरीजचा प्रत्येक भाग 40 मिनिटांचा आहे, त्यामुळे पूर्ण सिरीज पाहायला 3 दिवस लागले. फॅमिलीसोबतच 'फॅमिली मॅन' पाहण्यास सुरुवात केली. पहिला भाग संपत आला असतानाच, 3 जूनला या वेबसिरीजचा दुसरा भाग आला. पहिला भाग आवडल्याने लगेच दुसरा भागही पाहण्यास सुरुवात केली.

'फॅमिली मॅन'चा हिरो आहे, श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी). 'टास्क' (TASK) या भारतीय गुप्तहेर संस्थाचा 'सिनियर अनॅलिस्ट' आणि 'फॅमिली मॅन'. देशसेवा आणि फॅमिली सांभाळताना त्याची कसरत सुरु आहे. पहिल्या भागात 'इसिस' आणि पाकिस्तानी 'आयएसआय' सोबत त्याचा संघर्ष झाला. एका केमिकल कंपनीत अतिरेकी गॅस लीकेज करतात आणि पुढे काय होणार, असा प्रश्न मागे ठेवूनच सिरीजचा पहिला भाग संपतो.

केमिकल कंपनीतील गॅस लिकेजमुळे अनेक बळी जातात. मात्र, टास्क फोर्समुळे मोठी हानी टळते, हे सिरीजच्या दुसऱ्या भागात समोर येते. मात्र, आपल्या चुकीमुळे काही जीव गेल्याची खंत श्रीकांत तिवारीला आहे.  त्यातून, तसेच फॅमिलीला वेळ देता यावा, यासाठी श्रीकांत तिवारी 'टास्क फोर्स' सोडून एका आयटी कंपनीत जाॅईन होतो. मात्र, त्याचे मन अजूनही 'टास्क फोर्स'मध्येच अडकले आहे. आपला जुना मित्र जे. के. तळपदे याच्याकडून तो सतत 'टास्क फोर्स'ची माहिती घेत असतो.  

फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या भागात तामिळ बंडखोर आणि पाकिस्तानी अतिरेकी यांनी भारताच्या पंतप्रधान (सीमा बिस्वास) यांची हत्या करण्याचा कट रचला आहे. मुंबई, दिल्ली चेन्नई, श्रीलंका, लंडन, फ्रान्स येथे ही कहाणी घडत असली, तरी मुख्य कथाभूमी चेन्नईच आहे. तमिळींच्या वेगळ्या देशासाठी हा संघर्ष सुरु आहे. त्यासाठी भारत सरकारने तमिळी बंडखोरांना पाठिंबा द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. 

दुसऱ्या भागाची सुरुवातच श्रीलंकन सैनिक आणि तमिळ बंडखोर यांच्यातील लढाईने होते. तमिळ बंडखोरांचे नेते भास्करण आणि दीपन तेथून निसटून लंडनला पळून जातात. भास्करनचा छोटा भाऊ सुब्बू चेन्नईत लपून बसतो. हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन श्रीलंकेचा उपयोग करून घेत आहे.
भारताने बंडखोर सुब्बूला श्रीलंकेच्या हवाली करुन आपल्या सरकारला पाठींबा दिल्यास ते चीनला दूर ठेवतील, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रुपतुंगा यांचे म्हणणे आहे. भारतीय पंतप्रधान त्यास मान्यता देतात. एका कारवाईत सुब्बू मारला जातो आणि भास्करण याचा बदला घेण्याचे ठरवितो. त्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांची मदत घेतो.

भारत आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांची चेन्नई येथे शिखर बैठक होणार आहे. त्याच वेळी तेथे हवाई हल्ला करण्याचा कट भास्करण रचतो. हे काम राजी (समंथा अक्कीनेनी) ही तमिळ बंडखोर करणार असते. तिकडे आयटी कंपनीतील बॉसच्या कटकटीला वैतागून आणि बायकोसोबतच्या भांडणाला कंटाळून श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा 'टास्क फोर्स' जॉईन करतो आणि भास्करणचा प्लॅन उधळून लावतो. 

पहिल्या भागाप्रमाणेच फॅमिली मॅनचा दुसरा भागही प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. पटकथा लेखक सुमन कुमार यांनी गुंतागुंतीचा विषय असतानाही कथेवरील पकड निसटू दिलेली नाही. प्रेक्षकांना उसंत घ्यायलाही वेळ मिळत नाही, इतक्या वेगाने घटना घडत जातात. श्रीकांत तिवारी याच्या भूमिकेत मनोज वाजपेयी याने कमाल केली आहे. मात्र, सगळ्यात भाव खाऊन जाते ती राजी. सामंथा अक्कानेनी हिने या भूमिकेत अक्षरश: जीव ओतला आहे.

या भागातील सर्वात प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे भाषा. हिंदी, मराठी आणि तामिळी भाषेचा वापर करण्यात आला आहे. मदतीला सबटायटल आहेतच. चेन्नईतील वातावरण, तेथील बोलीभाषेचा जसाच्या तसा वापर केल्याने, सिरीज कुठेही नाटकी वाटत नाही. तमिळी कलाकार या सिरीजची जान आहेत. किंबहुना त्यांच्यामुळेच या भागाला चार चाॅंद लागले आहेत. सिरींजमधील उणिवा म्हटल्या, तर काही ठिकाणी कहाणी रेंगाळल्यासारखी वाटते. मात्र, एकंदरीत विचार केल्यास ही सिरीज तुम्हाला नक्की आवडू शकते.
सिरीजचा शेवट होतानाच, श्रीकांत तिवारीला आणखी एका मोहिमेवर जावे लागणार असल्याचे स्पष्ट होते. आता चीनी कुरापतीविरोधात श्रीकांत तिवारी लढताना दिसेल. लवकरच या सिरीजचा तिसरा भाग येणार असल्याचे स्पष्ट होते. राहा तयारीत..! 

5 comments:

  1. खरोखरच मनाला भावणारी आणि उत्कंठा वाढवणारी आहे ही वेबसिरीज.मी पहिली, भाऊराया खरंच भावभावनांचा कल्लोळ आहे ही सिरीज, तुम्ही ब्लॉग सुरू केलात तुमचे अभिनंदन...💐💐

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

दी फॅमिली मॅन : भावभावनांच्या कल्लोळात अॅक्शनचा तडका..!

  दुपारच्या वेळी मोबाईलवर टाईमपास चालला होता. अॅमेझाॅनवर काही वस्तू पाहत असताना, अचानक एक मेसेज दिसला. 'अॅमेझाॅन प्राईम'चा 15 दिवसां...